ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

मरण कवटाळणे भाग पडलेल्यांसाठी सहवेदना

मरण कवटाळणे भाग पडलेल्यांसाठी सहवेदना

@ अमर हबीब

*शेतकरी आत्महत्यांकडे समाजाचे आणि सरकारचे लक्ष वेधले जावे म्हणून महाराष्ट्रातील, देशातील आणि विदेशातील लाखो शेतकरी आणि किसानपुत्र 19 मार्च रोजी एक दिवस अन्नत्याग-उपवास करतात. काय आहे, कसे आहे हे आगळेवेगळे आंदोलन?*
———
19 मार्च हा साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियांच्या सामूहिक आत्महत्येचा स्मृती-दिन. 19 मार्च 1986 रोजी एकाच कुटुंबातील सहा जणांना प्राणत्याग करावा लागला, तो काळा दिवस. 

साहेबराव करपे यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावचे. पोटर्‍यात आलेला गहू वीज कनेक्शन तोडल्यामुळे जळताना पाहिला आणि अस्वस्थ होऊन त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. ते अनेक वर्षे गावचे सरपंच राहिलेले. घरात संगीताची परंपरा. ते स्वतःही गायचे. हा संवेदनशील माणूस कुटुंबियांना घेऊन पवनार जवळील दत्तपूर येथे गेला. तेथेच अन्नात विष कालवून त्यांनी सहकुटुंब आत्महत्या केली. नवरा बायको आणि चार मुले. मरण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात शेतकर्‍यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले होते. साहेबरावांना वाटले होते की, सरकार शेतकर्‍यांच्या परिस्थितीचा विचार करून सुधारणा करेल. दुर्दैवाने तसे घडले नाही.

अजूनही शेतकरी आत्महत्यांचा सिलसिला थांबलेला नाही. दररोज 40 ते 45 शेतकरी प्राणत्याग करतात. वर्ष 2019-20 मध्ये तर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे! दुर्दैवाने महाराष्ट्र या बाबत आघाडीवर आहे.

सरकार आपली धोरणे राबविण्यासाठी कायदे करते. शेतक़र्‍यांना गुलाम करणारे, त्यांचे मूलभूत हक्क (मालमत्ता, व्यावसाय व जगण्याचा नैसर्गिक हक्क) नाकारणारे, सीलिंग, आवश्यक वस्तू आदी संविधानविरोधी कायदे करण्यात आले. त्याविरुद्ध न्यायालयात जाता येणार नाही (परिशिष्ट-9) अशी घटनादुरुस्ती करण्यात आली. शेतकर्‍यांचे हात-पाय बांधून त्यांच्या घराला आग लावली, असे भीषण वास्तव आहे. सरकारे बदलली पण कायदे बदलले नाहीत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या त्याचीच परिणीती आहे.

 शेतीवर जगणे दुरापास्त झाले आहे म्हणून शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. खरे तर या आत्महत्या नसून सरकारने केललेल्या हत्या आहेत!

 आमच्या देशात अनेक नको त्या मुद्यांवर वाद होतात. सत्ताधारी, विरोधी पक्ष, मिडिया सगळे त्यात व्यस्त असतात. शेतकर्‍यांना स्वातंत्र्य द्यायला मात्र कोणी पुढे येत नाही. स्त्री असो की शेतकरी सर्जकाना लुटायचेच असते असा जणू रिवाज पडला आहे.

    अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो? आपल्या हातात सत्ता नाही, आपल्या हातात शस्त्रही नाही. आपण सामान्य माणसे आहोत. सामान्य माणूस काय करू शकतो?  
विचार करा, जर आपल्या घरात दुर्दैवाने अशी घटना घडली तर… त्या दिवशी आपल्याला घास जाणार नाही, होना? हो, मी देखील असाच विचार केला व 2017 साली पहिल्यांदा एक दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला. तेंव्हापासून दरवर्षी करतो. जोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबत नाही तोपर्यंत करत राहणार.

पहिल्या वर्षी (2017) साहेबराव करपे यांचे गाव चिल-गव्हाण येथे उपवास सुरू करून महागाव येथे उपोषणाला बसलो. दुसर्‍या वर्षी त्यांनी जेथे आत्महत्या केली त्या दत्तपुरला भेट देऊन पवनार येथे उपोषण केले. नंतरच्या वर्षी दिल्लीत म. गांधी समाधी (राजघाट) परिसरात उपवास केला. 2020 ला करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात म. फुले यांच्या वाड्याला भेट देऊन बालगंधर्वच्या समोर गटागटाने बसून उपोषण केले. जोपर्यंत शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबत नाहीत तोपर्यंत दरवर्षी 19 मार्चला आपण उपवास करायचा, हे नक्की.

    आज शेतकरी संकटात आहे. त्याच्या पाठीशी उभे राहणे प्रत्येक संवेदनशील नागरिकाचे कर्तव्य आहे. किसानपुत्रांची जबाबदारी आहे.
19 मार्च रोजी, आत्महत्या केलेल्या सर्व शेतकर्‍यांना स्मरून, शेतकरी स्वातंत्र्यासाठी, शेतकर्‍यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी, एक दिवस अन्नत्याग करूया. या आपल्या भावनेचा, कृतीचा आणि संकल्पाचा दूरगामी परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही, असा मला विश्‍वास वाटतो.

महारष्ट्रात सर्वदूर, सर्व स्तरातील लाखो लोक, आया-बहिणीं 19 मार्चला उपवास करतात. देशात अनेक शहरांमध्ये उपोषण केले जाते. एवढेच नव्हे तर विदेशात गेलेले अनेक किसानपुत्र एक दिवस अन्नत्याग करतात.

*तीन पर्याय-*
  19 मार्चच्या अन्नत्याग- उपवास- उपोषण यासाठी तीन पर्याय आहेत. तुम्हाला जो योग्य वाटेल तो पर्याय तुम्ही निवडू शकता.
      1) आपण उपवास करतो तसे दिवसभर वैयक्तिक अन्नत्याग करावा. (आवश्यकता वाटत असेल तर सोशल मिडियाद्वारे आपल्या मित्रांना कळवावे. त्यांनाही प्रेरणा मिळेल.)
      2) शक्य असेल तर उपवास करणार्‍यांनी संध्याकाळी 4 ते 6 या वेळात कोठेतरी एकत्र भेटावे. उपस्थितांपैकी सर्वात जेष्ठ व्यक्तीच्या हस्ते (किंवा तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने) सरबत घ्यावे. परस्परांच्या ओळखी व्हाव्यात, गाठीभेटी व्हाव्यात, ही अपेक्षा आहे. असे उपवासाचे सांगता कार्यक्रम ठिकठिकाणी होऊ शकतात.
      3) सार्वजनिक ठिकाणी बसून दिवसभर उपोषण करणार असाल तर रीतसर परवानगी काढावी. दिवसभर बसून उपवास करणार्‍यांनी बसावे पण वैयक्तिक उपवास करणार्‍यांना 4 ते 6 या वेळात येण्याचे सांगावे. त्यांच्या सोबत उपोषणाची सांगता करावी. दिवसभर बसणार्‍यांनी, ‘शेतकरी आत्महत्या कारणे व उपाय’ या विषयावर विचारविनिमय करावा. ‘शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण) या नरभक्षी कायद्यांवर चर्चा करावी किंवा ‘शेतकरी विरोधी कायदे’ या पुस्तिकेचे सामुहिक वाचन करावे.

आपल्या अवतीभोवती वणवा पेटला आहे. अशा परिस्थितीत काळाने आपल्यावरती जबाबदारी सोपविली आहे. फार नाही पण किमान एक दिवसाचा उपवास-अन्नत्याग करून या बाबत आपल्या सहवेदना व्यक्त करूया.

या उपोषणाचे आवाहन कोण्या पक्षाच्या किंवा संघटनेच्या वतीने केले जात नाहीये. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे. त्यासाठी या देशातील नागरिक या नात्याने या उपोषणात सहभागी व्हावे. 19 मार्च रोजी अन्नत्याग हे प्रत्येक किसानपुत्र व पुत्रीचे हे एक कर्तव्य आहे!
 
शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा-महाविद्यालायाच्या आवारात दोन मिनिटांचे सामुहिक मौन पाळून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकर्‍यांना श्रद्धांजली अर्पण करावी.

*पदयात्रा व श्रद्धांजली सभा-*
डॉ. राजीव बसरगेकर यांच्या पुढाकाराने 11 (महाशिवरात्र) ते 19 मार्च, अशी दहा दिवसांची औंढा नागनाथ ते चीलगव्हाण अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत कोणीही सहभागी होऊ शकतो. पूर्वसूचना (सुभाष कच्छवे 9921207666) या क्रमांकावर द्यावी. एवढेच!

करोनाची परिस्थिती बिकट राहिली नाही तर, 19 मार्च रोजी चीलगव्हाण (ता.महागाव, जि. यवतमाळ) येथे आत्महत्या केलेल्या तमाम शेतकर्‍यांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्यास अनेक मान्यवर उपस्थित राहतील. सरकारी निर्बंध लावले गेले तर मात्र निवडक लोक चील-गव्हाणला उपवास करतील.

-अमर हबीब,
किसानपुत्र आंदोलन, 8411909909
सोमवार, दि 1 मार्च 2021

error: Content is protected !!