ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

अहमदनगर शहर व जिल्ह्याला क्रमांक एकचा बनविण्याचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा निर्धार

गावविकासासाठी एकत्रित प्रयत्नातून काम करण्याचे आवाहन

अहमदनगर : पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहर आणि जिल्ह्याला विकासासाठी खूप वाव आहे. एकत्रितपणे काम केल्यास येत्या २-३ वर्षात हे शहर आणि जिल्हा राज्य व देशात क्रमांक एकचा बनेल. त्यासाठी आवश्यर ते सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. १५ व्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतींसाठी मिळणारा निधी सरपंच आणि ग्रामसेवक तसेच सदस्यांनी गावविकासासाठी नावीन्यपूर्ण आणि लोकोपयोगी कामांसाठी उपयोगात आणावास असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते आज स्व. आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम योजने अंतर्गत यशस्वी ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापती मीरा शेटे, उमेश परहर, काशिनाथ दाते, सुनील गडाख, जिल्ह्यातील विविध पंचायत समिती सभापती क्षितिज घुले, बाळासाहेब लटके, उर्मिला राऊत आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी स्व. आर. आर. आबांच्या आठवणींना उजाळा दिला. अतिशय कष्टातून स्वताचे नेतृत्व तयार करणार्‍या आबांनी पारदर्शकपणे कारभार केला. गावविकासा साठी असणार्‍या त्यांच्या तळमळीने विविध योजना आकाराला आल्या आणि त्यातून हजारो गावांचा कायापालट झाला. त्यामुळेच सुंदर गाव योजनांचे पुरस्कार त्यांच्या नावाने आणि त्यांच्या स्मृतिदिनी घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे कौतुक करीत पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, या ग्रामपंचायतींनी आता यावरच न थांबता अधिकाधिक नावीन्यपूर्ण संकल्पना गावात राबवाव्यात. ज्या कामांमुळे हा पुरस्कार मिळाला, त्याहून अधिक सुंदर काम करण्याची प्रेरणा हे पुरस्कार देतील. सर्वांना सोबत घेत ग्रामविकासासाठी प्रयत्न केले तर महात्मा गांधीनी दिलेला खेड्यांना स्वयंपूर्ण करण्याचा दिलेला सल्ला प्रत्यक्षात आल्याचे चित्र दिसेल, असे त्यांनी नमूद केले.

गावविकासासाठी आता ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून मोठा निधी मिळत आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता तसेच इतर विकासकामांसाठी हा निधी आहे. त्याचा योग्य विनियोग करुन विकास साधावा. या आयोगाचा ४ हजार ३६८ कोटी रुपयांचा पहिला हप्ता राज्यातील ग्रामपंचायतींना उपलब्ध करुन दिला आहे. येत्या ५ वर्षात २९ हजार कोटी रुपये ग्रामपंचायतींना विकासासाठी मिळणार असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्रत्येक गावांने त्यांच्या गावात प्राथमिक शाळेसाठी चांगली इमारत, अंगणवाडीसाठी इमारत आणि स्मशानभूमी असेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. या बाबींच्या पूर्ततेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे राज्य आर्थिक संकटात असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा विकासासाठी १२८ कोटी रुपयांचा अधिकचा निधी मंजूर केला तसेच चालू वर्षासाठीही पूर्णपणे निधी उपलब्ध करुन दिल्याने विकासाला गती मिळणार असल्याचे ते म्हणाले.

जिल्हा परिषद अध्यक्षा घुले यांनी, ग्रामविकास क्षेत्रात गावपातळीवर विविध विकास कामे होत असल्याचे सांगितले. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडेच ग्रामविकास विभाग असल्याने ग्रामीण भागातील अडचणी दूर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ आणि मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन २०१८-१९ मध्ये जिल्हास्तरावर प्रथम – ग्रामपंचायत खडांबे खुर्द (ता. राहुरी ) आणि वाळवणे (ता. पारनेर) यांना विभागून. सन २०१९-२० मध्ये जिल्हास्तरावर प्रथम – ग्रा.पं. गणोरे (ता. अकोले) आणि आव्हाणे बु. (ता. शेवगाव) यांना विभागून. सन२०२०-२१ मध्ये जिल्हस्तरावर प्रथम – ग्रा. पं. निमगाव बु. (ता. संगमनेर) आणि खडकेवाके (ता. राहाता) यांना विभागून. तसेच सन २०२०-२१ मध्ये तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत. डोंगरगाव (ता. अकोले), निमगाव बु.(ता. संगमनेर), करंजी (ता. कोपरगाव), श्रीरामपूर- जाफराबाद आणि मुठे वडगाव यांना विभागून. खडकेवाके (राहाता), सडे (राहुरी), वडाळा बहिरोबा (नेवासा), राक्षी (शेवगाव), चिचोंडी (पाथर्डी), खर्डा (जामखेड), कानगुडवाडी आणि कोपर्डी विभागून (कर्जत), मढेवडगाव (श्रीगोंदा), जामगाव (पारनेर) आणि टाकळी खातगाव (नगर) या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जिल्हास्तरावरील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना ४० लाख तर तालुका स्तरावर पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना १० लाख रुपयांचे पारितोषिक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी जिल्हा स्तरावरील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीनी केलेल्या विकासकामांची यशोगाथा लघुपटाद्वारे दाखवण्यात आली.

यावेळी ग्रामसेवकांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी एकनाथ ढाकणे (गणोरे), सरपंचांच्या वतीने आव्हाने बु. च्या सरपंच संगीता कोळगे यांनी मनोगत व्यक्त केले. या पुरस्कार वितरण कार्यक्रमास जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे सदस्य, पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अधिकारी-कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भोर यांनी केले. सूत्रसंचालन उध्दव काळा पहाड आणि गौरी जोशी यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी मानले

error: Content is protected !!