ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

अनिष्ट प्रथांवर कडाडून हल्ला करणारे पहिले मानवतावादी संत – गुरू रविदासजी महाराज

अनिष्ट प्रथांवर कडाडून हल्ला करणारे पहिले मानवतावादी संत – गुरू रविदासजी महाराज

तेराव्या-चौदाव्या शतकात हिंदूस्थानमध्ये हिंदू समाज अंधश्रध्दा, कर्मकांड, जातीवाद, रूढी आणि परंपरामध्ये जखडलेला होता. पुरोहितवादी हिंदूस्थानात बोकाळलेला होता. हिन, दीन समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन उच्चवर्णीय समाज त्यांचा छळ करीत होता. त्यांच्याकडून गुलामगिरी करून घेत होता. अशा काळी मानवाला मुक्ती देण्यासाठी शुद्र, अतिशुद्रांना गुलामगिरीतून सोडविण्यासाठी अनेक संतांनी भरीव काम केले होते. त्यात संत कबीर, संत नामदेव, संत सेना, संत नरहरी, संत चोखामेळा, गुरूनानक, संत तुकाराम, संत गाडगेबाबा आणि ज्यांनी खर्‍या अर्थाने मानवतावादाचा सिध्दांत चौदाव्या शतकात मांडला असे पहिले महान संत शिरोमणी गुरू रविदासजी महाराज. अशा या महान संतांची आज दि.15 फेब्रुवारी 2022 रोजी 645 वी जयंती आहे. ही जयंती संपूर्ण भारतभर नव्हे संपूर्ण जगभर उत्सव, मिरवणूका आणि प्रवचने घेवून उत्साहात साजरी केली जाते. त्या निमित्त सर्व विज्ञानवादी, मानवतावादी विचाराधा जोपासणार्‍या सर्व मानवजातीस गुरू रविदासजींच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
संत रविदास महाराज यांच्या जन्मतिथीबद्दल बरेचसे मतभेद असले तरी काशीजवळील सिर गोवर्धनपूर येथे चवर वंशाच्या एका गरीब चर्मकार कुटूंबात तिथीनुसार माघ महिन्याच्या पौर्णिमेला व तारखेनुसार दि. 15 फेब्रुवारी 1376 रोजी रविवार या दिवशी जन्म झाल्यामुळे त्यांच्या आई-वडीलांनी त्यांचे नाव रविदास असे ठेवले. त्यांच्या वडीलांचे नाव रघुनंदन व आईचे नाव रघुराणीदेवी होते तर पत्नीचे नाव लोणादेवी हे होते. रविदासांचे वडील हे शेती व लाकडाचा व्यवसाय करीत होते.
धार्मिक बंधनामुळे शुद्रांना पाठशाळेत शिक्षण घेण्यास मज्जाव होता. त्यामुळे त्यांचे लौकिक कार्याने पाठशाळेत शिक्षण झाले नाही. परंतु साधु संतांच्या संगतीत ते खुप काही शिकले. मध्ययुगीन भारतातील संतांच्या परंपरेत गुरू रविदासांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्या काळात शुद्रांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई होती. मंदिरात प्रवेश केला तर देव बाटत असे. ज्याने देवाचे पावित्र्य मलीन केले त्याचे हात-पाय तोडण्यापासून मृत्युदंडापर्यंतची शिक्षा होत असे. अंधश्रध्दा, कर्मकांड, ढोंगीपणा, उच्चनीचपणा आणि दैववाद यांनी समाज बुरसटलेला होता.
रविदासांची शिकवण अत्यंत साधी आणि सर्वांना आचरणात आणण्यासारखी होती. ते म्हणत सदैव प्रामाणिकपणे काम करा, आणि त्या कामाची प्रतिष्ठा राखा, जे काम करतात ते निष्ठेने अंत:करणापासून करा, गुरु रविदास यांनी रचना केलेल्या काव्यामध्ये त्यांचे विचार सुस्पष्ट आणि निसंदिग्धपणे विषद केलेले आढळतात. अशा स्थितीमध्ये संत रविदास यांनी तत्कालीन हिंदू समाजातील अंधश्रद्धा, चालीरीती तसेच जातीय प्रथेला तीव्र विरोध करून त्यांनी नवीन क्रांतिकारी विचार मांडले. कोणीही जन्माने नीच किंवा उच्च नसतो, नीच कर्म करणार्‍यास नीच समजावे असे ते सांगत.

जात जात मे जात है जो केलनमे पात।
रविदास न मानुष जुड सके जो लौ जातन जात।

जात ही केळीच्या झाडासारखी आहे. त्याची कितीही पानं काढा शेवटीही पानच राहते. त्यास खोड नाही. रविदास यांच्या अशा मानवतावादी विचार आणि परखड लिखाणाची पूजा होते. शिखांच्या धर्मग्रंथात रविदासांचे चाळीस दोहे आणि एक श्लोक गुरु ग्रंथसाहिब मध्ये आहे. शीख धर्मीय या ग्रंथास देव मानतात. गुलामी पाप आहे, गुलामगिरी करून घेणारा पापी आहे. आणि माझ्या डोळ्यासमोर हे घडत आहे, मी काही करू शकत नाही, पापाचा मीही भागीदार आहे. गुरू रविदास यांनी सर्वांचे दुःख समजून घेतले आणि भक्तीचा सोपा मार्ग दाखविला.

मन ही पूजा मन ही धूप। मन ही सेवू, सहज स्वरूप।
मन चंगा तो काठोट मे गंगा॥

देव मनातच आहे व खरे देव जन्मदातेच आहेत. त्यांची पूजा करा. तो दुसरीकडे कोठेही नसून तो आपल्या अंतरात्म्यातच आहे. गुरु रविदास यांनी फार मोलाचे कार्य केलेले आहे.

ब्राह्मण मत पुजो जो होऐ गुण हिन।
पुजो चरण चंडाल के, जो होऐ गुण परविन॥

त्या ब्राह्मणाची पूजा करू नका जो निर्बुद्ध आहे परंतु ज्या व्यक्तीमध्ये बुद्धिमत्ता आहे, जो गुणवान आहे, तो शुद्र जरी असला तरी त्याची पूजा करा. अंधश्रद्धा, जातीयवाद यावर रविदासांनी कडाडून टीका केली आहे. संत रविदासांचे नेतृत्व ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे धोरण राबविणारे होत.े समाजातील सर्व लोक सुखी व्हावेत हीच त्यांची तीव्र इच्छा दिसून येते. समाज दुःखमुक्त होण्यासाठी राजसत्ता ही तळागळातील नीतिमान राज्यकर्त्यांच्या हातात असावी हेही स्पष्ट ते करतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर घटना मसुदा समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी सर्व धर्माचा, सर्व संतांचा अभ्यास केला. त्यातून गुरु रविदास यांच्या एका दोह्यास प्रेरित होऊन डॉ. बाबासाहेब म्हणाले रविदास यांच्या एका दोह्यातच संपूर्ण देशाची राज्यघटना आहे.

ऐसा चाहू राज मै जहा मिले सबन को अन्न।
छोट बडो सम बसे रविदास रहे प्रसन्न॥

या दोह्यावरआधारित आपली राज्यघटना आहे. डॉ.बाबासाहेबांनी गुरु रविदास यांना आपल्या गुरु स्थानी मानून स्वलिखित ‘दी अनटचेबल’ नावाचा ग्रंथ रविदास चरणी अर्पण केला. यावरून रविदासांची उंची आपणास लक्षात येते. रविदासांनी आपल्या आई-वडिलांची मनोभावे सेवा केली. रविदास यांच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित होऊन गुरु शारदानंद यांनी स्वतःच्या आश्रमामध्ये प्रवेश दिला. त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर काशीच्या अनेक विद्वान पंडितांना हरवलं. रविदासांचे ईश्वर भजन, काव्य व प्रचंड बुद्धिमत्ता मुळे त्यांना हजारो शिष्य मिळाले. संत मीराबाई यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. सुरुवातीच्या काळामध्ये रविदासांनी कुंभमेळा, मथुरा, वृंदावन येथे भेटी दिल्या. इतकेच काय शिष्यांच्या आग्रहास्तव पंजाब, गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र येथेही भेटी दिल्या होत्या. म्हणूनच त्यांना उत्तर प्रदेशात रविदास, पंजाब मध्ये रैदास, बंगाल मध्ये रईदास, महाराष्ट्रात रोहिदास, उत्तरेकडील हिंदी भारतीय प्रांतामध्ये रायदास अशा वेगवेगळ्या नावाने संबोधले जाऊ लागले.
गुरू रविदास यांच्या महाराष्ट्रातील त्यांचा एक शिष्य गोविंद चामार होऊन गेल्याचे काही विद्वानांचे मत आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका लहानशा गावात त्यांनी प्रचार व प्रसाराचे कार्य सुरु केले. त्यामुळे त्या गावचे गोविंदा चामाराच्या नावावर नाव ठेवले. त्याचा अपभ्रंश होऊन ते गाव 1936 पर्यंत चमार गोंदा या नावाने ओळखले जाऊ लागले. आज मात्र त्या गावाचे नाव श्रीगोंदा असे बदलण्यात आले आहे. गुरू रविदास यांच्या वर्ण-व्यवस्थे विरोधी विचारांच्या प्रसारामुळे हिंदू धर्मातील प्रस्थापितांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे वयाच्या 120 व्या वर्षी म्हणजेच 10 ऑक्टोंबर 1496 मध्ये चित्तोडच्या किल्ल्यात त्यांची हत्या करण्यात आली. पण रापीने छाती चिरून घेऊन ते सदेह ब्रह्मांडात विलीन झाल्याचे लिहिण्यात आले. तेराव्या शतकात होऊन गेलेल्या या संतांचे मानवतावादी विचार त्याकाळी आणि त्यांच्या निर्वाणानंतर देखील कित्येक शतके लोकांना इतके भावले की त्यांचा रविदास नावाचा पंथ निर्माण झाला. परदेशात विशेषता कॅनडा आणि इंग्लंडमध्ये, युनायटेड किंगडम, ग्रेट ब्रिटन मध्ये त्यांची भव्य मंदिरे त्यांच्या प्रखर मानवतावादी विचारांची आजही साक्ष देतात. रविदास महाराजांचे तिरुपती बालाजी येथील डोंगराजवळ वैकुंठ परीस येथे स्मृतिस्थळ आहे. राजस्थानात मांडवगड चित्तोड येथे कुंभ रामाच्या मंदिरात रविदासांची छत्री आहे. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे सुद्धा रविदास यांचे मंदिर आहे. जालंदर पंजाब येथे जगातील सर्वात मोठे सत्संग भवन आहे. शिर गोवर्धनपूर, वाराणसी, उत्तर प्रदेश मध्ये भव्य मंदिर आहे. कात्रज कोंढवा रोड पुणे येथे भव्य मंदिर आहे. तसेच पंढरपूर येथे त्यांच्या नावाने मठ आहे.
मनुवाद्यांनी रविदासांचे विचार, त्यांचं साहित्य समाजापर्यंत पोहोचू दिला नाही. समाजाच्या मागणीमुळे आत्ता कुठे इयत्ता पाचवीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये ‘विचारधन’ मध्ये त्यांच्या दोह्यांचा समावेश केला आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये रविदास यांच्या विचाराचे साहित्य शालेय पाठ्यपुस्तकात येण्याची खूप मोठी गरज आहे. तेव्हाच खर्‍या अर्थाने रविदास यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल. गुरू रविदास महाराजांनी केलेल्या महान कार्याचा खर्‍या अर्थाने गौरव उत्तर प्रदेश मध्ये स्वर्गीय मान्यवर कांशीरामजी यांच्या प्रेरणेने बहन सुश्री मायावती सरकारने केला आहे. तेथे रविदास यांच्या नावाने ‘गुरू रविदास नगर’ असे जिल्ह्याचे नामकरण केले आहे. त्यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश केला असून त्यांच्या नावाने ग्रंथालये, मोठमोठी उद्याने, पार्क उभारण्यात आले आहेत. सामाजिक रूढीतून मुक्त होण्यासाठी समाजपरिवर्तनाची आकांक्षा ठेवणार्‍या प्रत्येकाने गुरु रविदास यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी हातभार लावावा, रविदासांची आठवण ठेवावी, सेवा आई-वडीलांची करावी. जाती भेदाभेद जाळून टाकावा, मुला-बाळांना शिकवावे, गरजूंना मदत करावी तेव्हाच खर्‍या अर्थाने गुरु रविदास यांना श्रद्धांजली होईल.
त्यांच्या 645 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन….!

error: Content is protected !!