ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

शिवरायांची आरती नको जिजाऊ वंदनाच व्हावी

शिवरायांची आरती नको जिजाऊ वंदनाच व्हावी
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पुरेल आणि तरीही उरेल अशी अक्षय ऊर्जा आहे. अशी विवेकी, विचारी, सृजनशील व्यक्तिमत्व जन्माला यायला, घडायला अनेक पिढ्या, अनेक युगे जावी लागतात. त्यामुळेच ते युगप्रवर्तक युगपुरुष ठरतात. त्यांचे विचार आणि कर्तृत्व व्यक्तीपासून विश्वापर्यंत सर्वांसाठीच दीपस्तंभासम दिशादर्शक मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. लढण्यासाठीचं, झुंजण्यासाठीचं बळ, प्रेरणा, ऊर्जा ही शिवचरित्रातून मिळते.
           छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व, दातृत्व, मातृत्व, त्यांचे बुद्धीचातुर्य, मुत्सद्दीपणा, शौर्य, धाडस, या सर्व गुणांनी त्याचबरोबर न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, सर्वधर्मसमभाव, स्त्री पुरुष समानता, या सर्व मूल्यांनी ते इतिहासात मानवी आदर्षांचा सर्वोच्च मानबिंदू बनलेले आहेत. मानवतावादी योद्धा, आदर्श शासक, प्रशासक, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, शेती, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, पर्यावरण, राजकारण, भाषा, धर्म, संस्कृती यांचे जाणकार होते. त्याचबरोबर धर्मसत्तेपेक्षा राजसत्ता श्रेष्ठ असते असे ठणकावून सांगणारे जगातील पहिले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. त्यांचा अद्वितीय पराक्रम, आदर्श राज्यकारभार, तळागाळातील गोरगरीब रयतेच्या हिताचा विचार, शेतकरी, कष्टकरी दीन दलित, स्त्रिया यांचा सन्मान, अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती करणाऱ्यांना कडक शासन, जहागीरदार, वतनदार, जमीनदार, कुलकर्णी, पाटील, देशपांडे, या सर्वांना वठणीवर आणले. हे राज्य रयतेचं आहे आणि रयतेसाठी आहे असा लोकांना दिलेला विश्वास, स्वच्छ, निष्कलंक, पारदर्शी आणि रयताभिमुख आचरण, यामुळे ते रयतेमध्ये लोकप्रिय झाले. त्यांनी इथल्या रयतेच्या काळजात घर केले. स्वराज्याचे सिंहासन आधी रयतेच्या मनात तयार झाले. महाराज आधी कोट्यावधी लोकांच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान झाले. आणि मग नंतर ०६ जून १६७४ ला दुर्गराज रायगडावर बत्तीस मण सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले.
           असं म्हटलं जातं की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. जगातल्या इतर राजांनी जे केलं ते शिवरायांनी कधीच केलं नाही आणि जे शिवरायांनी केलं ते जगात कोणाच्या बापाला जमलं नाही. त्यामुळे ज्या काळात युरोपातील राष्ट्रात जनता राजांना पदच्युत करत होती, ठेचून मारत होती त्या काळात भारतातली, महाराष्ट्रातली शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब रयत शिवरायांना राजा बनवण्यासाठी प्राण तळहातावर घेऊन लढत होती.
          छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते आणि आजही जगभरातील अठरापगड जाती धर्माच्या अब्जावधी लोकांच्या हृदय सिंहासनावर ते विराजमान आहेत. आजही जगभरातील लोकांना शिवराय अभ्यासावे वाटतात. कारण आजही आणि भविष्यातही वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय व जागतिक जीवनामध्ये काही गुंतागुंत व समस्या निर्माण झाली तर त्या समस्येचे उत्तर शिवचरित्रात सापडते. संकट कितीही मोठे येऊ द्या, परिस्थिती कितीही प्रतिकूल असू द्या, त्याला कसं सामोर जायचं हे शिवचरित्र शिकवतं. खचू नका, निराश होऊ नका आणि संकटापासून, परिस्थितीपासून दूर पळू नका, भीडा, लढा, सामना करा, जिंका कारण लढणं आणि लढत लढत जगणं हेच खऱ्या वीराचं जगणं आहे हा जीवनाचा मंत्र शिवचरित्रातून मिळतो. आधुनिक जगाच्या इतिहासातील मानवाने मिळवलेलं पहिलं स्वातंत्र्य आणि शिवरायांचे स्वराज्य म्हणजे जगातील पहिले लोकशाही राज्य अशी नोंद सुवर्ण अक्षरांनी जगाच्या इतिहासात झाली आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी अहद तंजावर तहद पेशावर माझेच राज्य असेल. म्हणजे त्या काळच्या संपूर्ण भारतावर राज्य करण्याचे स्वप्न पाहिलं त्यांची हीच प्रेरणा येणाऱ्या पिढ्यांना जगावर राज्य करण्याचं बळ, दृष्टी व ऊर्जा देईल त्यांच्या आदर्शांपासून प्रेरणा घेऊन आजतागायत भारतात आणि जगभरात अनेकांनी इतिहास घडवला आहे, प्रेरणादायी कार्य केलेले आहे. शिवरायांचे हे उत्तुंग कर्तृत्व निष्प्रभ करण्याचे षडयंत्र या महाराष्ट्रात रचले जात आहे हे दुर्दैवी आहे.
           अशा आमच्या विश्ववंदनीय राजाला देवत्वाच्या फ्रेममध्ये बंद करण्याचं, मंदिरात बंद करण्याचं, आणि त्यांचा अभिषेक व आरती करून, त्यांना शिवशंकराचा अवतार दाखवून, त्यांच्या विचार आणि कर्तुत्वाची माती करण्याचं षडयंत्र काही शिवद्वेष्टे जाणीवपूर्वक करत आहेत. ते रोखणं हे सच्चा शिवप्रेमिंसमोरचं मोठं आव्हान आहे. छत्रपती शिवाजी महाराज माणूस होते. ते मानव कुळात, मानवाच्या पोटी जन्माला आलेला हाडामासाचा खराखुरा माणूस, त्यांचं कर्तृत्व हे मानवी कर्तृत्व, त्यांना जर देवत्व बहाल केलं आणि मंदिरात बंद केलं तर आमच्या येणाऱ्या पिढ्यांचं काही खरं नाही. कारण एकदा दैवतीकरण झालं की ते ऐतिहासिक व्यक्तिमत्व आमच्या कामाचं राहत नाही.
         आरती, अभिषेक, मंदिरे देवाची असतात, कर्तृत्ववान माणसांची नव्हे. छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते तर मानवी मूल्य जपणारे आदर्श मानव होते. ते देवा पेक्षा कमी नव्हते पण देव मात्र निश्चितच नव्हते. तर देव माणूस होते. त्यांना देवत्वाच्या फ्रेममध्ये बंद करणे आम्हाला परवडणार नाही. मानवी कर्तुत्वाला दैवी पाठिंबा हवाच परंतु दैवी आवरणाखाली मानवी कर्तृत्व झाकले जाऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे.
          शिवराय देवाला मानत होते. तुळजापूर निवासीनी तुळजाभवानी, शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुळदैवतं होती. श्रद्धास्थानं होती. महाराजांच्या किल्ल्यांवर ही दोन्ही मंदिरे महाराजांनी बांधली होती याचे आजही पुरावे आहेत. त्यांच्या सैन्याचे घोषवाक्य हर हर महादेव तर महाराजांच्या मुखामध्ये जगदंब हे नाव आणि गळ्यात कवड्याची माळ होती. राजे श्रद्धाळू होते पण अंधश्रद्धाळू नव्हते. राजे धार्मिक होते पण धर्मांध नव्हते. शिवराय देवाला मानत होते पण देववादी नव्हते. प्रयत्नवादी होते दैववादी नव्हते. देव आणि धर्मापेक्षा देश मोठा आणि महत्त्वाचा असतो असे मानणारे होते. देवाच्या मंदिरात आणि जगातल्या एकाही धर्मात आजही सर्वांना समान संधी, समान दर्जा, प्रवेश नाही पण शिवरायांच्या दरबारात कसलाच भेद नव्हता म्हणूनच ते देवांपेक्षाही महान ठरतात.
           आमच्याकडे देवांची संख्या कमी नाही. देवांच्या सण उत्सवांची, यात्रा जत्रांचीही संख्या कमी नाही. आम्ही ते सगळं आनंदाने आणि अभिमानाने करतो. आमच्या आदर्श परंपरा जपतो. आमची भावना, संस्कृती, श्रद्धा जपण्यासाठी ते पुरेस आहे. आणखी देवांची संख्या वाढवण्याची गरज नाही. शिवराय मंदिरात पुजले तर आपल्या भावी पिढ्यांसमोर उच्च आदर्श राहणार नाहीत परिणामी येणाऱ्या पिढ्या कर्तृत्वशून्य होतील. शिवरायांचे विचार व कार्य नसानसात भिनायला हवे तेव्हा कुठे अंगावर येणारी वादळं थोपवता येतील.
           मंदिर, आरती, अभिषेक झाला की मग चमत्कार येतात, भाकडकथा, पुराणकथा, मिथकं येतात. आजपर्यंतही हे झालेलच आहे. शिवरायांना भवानी माता प्रसन्न होती. भवानी मातेने तलवार दिली. त्यामुळेच शिवराय एवढा पराक्रम गाजवू शकले. अशाही वावड्या उठवल्या गेल्या. म्हणजे शिवरायांनी आपल्या आयुष्याचं धगधगतं अग्निकुंड केलं. संघर्ष केला, कष्ट सोसले, जीवावरच्या जोखीमा पत्करल्या याला काहीच किंमत उरत नाही. त्यांचे शौर्य, धाडस त्यांच्यात असलेल्या दैवी सामर्थ्यामुळेच होते असे भासवले. तसा जाणीवपूर्वक प्रचार करणे यापेक्षा शिवरायांचा दुसरा मोठा अपमान कुठला असू शकतो. त्यांच्या पराक्रमाचे श्रेय देवाला दिल्याने जागतिक इतिहासातही त्यांना स्थान मिळणार नाही. कारण अवतार फक्त भारतात चालतात जगात चालत नाहीत. त्याचबरोबर अवतार ही संकल्पना इतिहासाच्या दृष्टिकोनातून वास्तव स्वरूपात टिकत नाही हे हजारो पुराव्यांशी सिद्ध झालेलं आहे. शिवरायांनी आपल्या जीवनाचं रणकंदन केलं तेव्हा कुठे शिवभारत घडलं. ज्यामध्ये रामायण आणि महाभारतातील आदर्श मूल्यांचे प्रतिबिंब दिसते ते शिवभारत.
       शिवरायांच्या कर्तुत्वाला देवत्वाच्या फ्रेममध्ये बंद करून त्यांच्या इतिहासाचा जनमानसातील प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो आहे. शिवरायांना मंदिराच्या गाभाऱ्यात बसवून त्यांची आरती आणि अभिषेक करून ज्या समाजासाठी शिवराय जगले, झुंजले, आयुष्यभर निकराचा लढा दिला. पुढे चालून त्याच समाजाला देवाच्या, धर्माच्या, कर्मकांडाच्या मार्गाने नेलं जाईल व समाजाचं मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक शोषण केलं जाईल. एवढेच नाही तर उद्या शिवराय कोणाच्या अंगात आले किंवा त्यांच्यासमोर नवस- सायास, उपास – तापास, अंगारे – धुपारे, गंडे – दोरे सुरू झाले तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे हे दैवतीकरण थांबनं गरजेच आहे.
          देव आणि मानव या पूर्णपणे भिन्न बाबी आहेत. त्यामुळे देवाने जे केलं ते मानव कधीच करण्याच्या भानगडीत पडत नाही. समजा आपल्याला कोणी सांगितले हनुमानाप्रमाणे उड्डाण करा आणि पर्वत उचलू आणा किंवा राम कृष्णा प्रमाणे एखादी गोष्ट करा तर आपले उत्तर काय असेल ? अरे तो हनुमान देव आहे रामकृष्णही देव आहेत मग आपल्याला देवासारखे करायला कसे जमेल आपण फक्त त्यांची मंदिरे बांधायची, पूजा करायची, आरती करायची, प्रसाद खायचा आणि हात पुसून मोकळ व्हायचं, कारण आपल्याकडे दैवी शक्ती नाही त्यामुळे आपण देवासारखे वागण्याचा प्रयत्न करायचा नसतो. अशीच सार्वत्रिक मानसिकता असते. शिवरायांच्या इतिहासाचे जे दुश्मन आहेत त्यांना हेच घडवायचं आहे.
         शिवरायांच्या हयातीपासून आजतागायत अनेकांनी अनेक वेळा अनेक मार्गांनी त्यांचे कर्तृत्व खुजे करण्याचा, झाकोळण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आजही सुरू आहे. पूर्वग्रहदूषित भावनेतून लिहिलेल्या इतिहासातून, कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मालिका, नाटकं आदींमधून शिवरायांच्या, जिजाऊंच्या, शंभूराजेंच्या आणि एकूणच त्यांच्या परिवारातील व्यक्तींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. बदनामी केली चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. पण ही सगळी व्यक्तिमत्व एवढी प्रभावी होती की सगळ्यांना पुरून उरली. आज पर्यंतचे वारंवार बदनामी करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात मग दैवतीकरण करायचे आणि त्यांची प्रेरणा नष्ट करायची. त्यांनी जे केलं ते देव होते म्हणून त्यांना जमलं. आपण मानव आहोत आपल्याला कसे जमेल ही मानसिकता एकदा रूढ झाली तर शिवकार्य कसे साधणार ? हे जर नाही थांबवलं तर महाराज फक्त आणि फक्त देवळातील व घराच्या देवघरातील देव बनून शिल्लक राहतील हे मात्र निश्चित.
         इतिहास हा वस्तुनिष्ठ असावा लागतो. घडलेल्या घटनेवरून तो जसा घडला तसा लिहावा लागतो. अंदाज, कल्पना, भावना, श्रद्धा, कोणाची मते मतांतरे याला त्यात स्थान नसते. कारण इतिहासाला सबळ पुरावे लागतात. सत्य इतिहास जपणं आणि वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं असतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करून दुष्टकावा साधला जातोय. तेव्हा शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांना अवताराकडे, चमत्काराकडे, देवत्वाकडे नेण्याच्या या कपटनीतीचा धोका ओळखून सावध असले पाहिजे.
          आरतीपेक्षा लाख पटीने जिजाऊ वंदना चांगली ती जनमानसात मनामनात, घराघरात, राज्यभरात, देशभरात आणि जगभरात पोहोचली आहे रुजली आहे. लोकांनी स्वीकारली आहे. लाखोंचे मराठा क्रांती मोर्चे असोत किंवा मनोज जरांगे पाटलांच्या रेकॉर्डब्रेक सभा असोत या सर्वांची सांगता वा सुरुवात जिजाऊवंदनेनेच झाली. हे सर्व चांगले घडत असताना जिजाऊ वंदनेला पर्याय म्हणून जाणीवूर्वक आरती पुढे आणली.
            ज्या जिजाऊंनी उदरात बाळ आणि उरात महाराष्ट्राची काळजी वाहिली, ज्यांनी चारशे वर्षांपूर्वी आमचा कोंदलेला श्वास मोकळा केला. ज्या काळात मराठी मातीत सर्वत्र मुर्दाड आणि निसत्व वातावरण निर्माण झालं होतं. पारतंत्र्य आणि गुलामी बद्दल कोणाला तिटकारा वाटत नव्हता. स्वातंत्र्य गमावल्याबद्दल खेद वाटत नव्हता. भूमिपुत्रांना मुस्कटदाबी मुकाट्याने सहन करावी लागत होती. अस्मानी आणि सुलतानीला तोंड देता-देता रयत पिचली होती. दैववादी बनून आजचं मरण उद्यावर ढकलत होती. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड यांनी अक्षरशः हैदोष घातला होता. स्त्रियांना गुलामीचं जीनं बहाल केलं गेलं होतं. माणसा माणसात जातिभेदाच्या भिंती निर्माण केल्या गेल्या होत्या. समाजाने क्षत्रियत्वाच्या विचारांकडे पाठ फिरवली होती. समाज बलहीन सत्वहीन आणि तेजोहीन बनला होता. अशा परिस्थितीत जिजाऊंनी प्रयत्नवादी विचारांची पेरणी केली. रयतेच्या गमावलेल्या स्वत्वाला फुंकर घातली. निखाऱ्यांवर साचलेली काजळी दूर केली. त्यांच्यातील स्वाभिमान जागा केला. त्यांना क्षात्रबाण्याची शिकवण दिली. शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभा केलं. या मातीमध्ये शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं मायमाऊल्यांचं, अठरापगड जाती धर्मातील रयतेचं राज्य निर्माण केलं. इथली रयत सुखी केली. अत्याचार, शोषण करणाऱ्या, लुटणाऱ्या जुलमी सत्ता उध्वस्त केल्या. या मातीत स्वराज्य, सुराज्य निर्माण केलं. या मातीसाठी अन् मातीच्या स्वाभिमान आणि अभिमानासाठी, स्वराज्यासाठी, रयतेच्या राज्यासाठी, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊं माँसाहेबांना जिजाऊ वंदनेच्या माध्यमातून वंदन करणे निश्चितच चांगले राहील. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करणारा राजा घडवला.
          राजाच्या कुटुंबात जन्माला येऊन दुसऱ्या राजाशी विवाह करून मुलाला जन्म देऊन राजमाता होणं वेगळं आणि सरदाराच्या कुटुंबात जन्माला येऊन एका सरदाराची पत्नी असूनही स्वराज्य निर्मितीच्या लढ्याचे सारध्य करून आपल्या मुलाला बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनापर्यंत, राजेपदापर्यंत पोहोचवणाऱ्या, छत्रपती बनवणाऱ्या जिजाऊंचे कार्य अद्वितीय व प्रेरणादायी आहे. रयतेचं राज्य निर्माण व्हावं म्हणून जिजाऊंनी आपल्या संसाराची वाटणी केली. पोटच्या पोरांची वाटणी केली. संसारिक जीवनाची बावीस वर्ष फक्त आठवणींवर जगले. या त्यागाचं मोल करता येणार नाही. त्यांनी त्याग केला नसता, ते झिजले नसते, तर हे सोहळे सजले नसते. पुढे हेच सोहळे वर्षानुवर्षे सजवायचे असतील तर इतिहास जपला पाहिजे. आणि त्यासाठी आरती ऐवजी जिजाऊ वंदना झाली पाहिजे.
       प्रबोधनकार ठाकरे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे की नुसतं जय शिवराय जरी म्हटलं तरी तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते. एवढं महान कर्तुत्व असलेल्या आपल्या राजांचं दैवतीकरण रोखणं ही शिवप्रेमी म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे.
      कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात एक वर्षाची सोय लावायची असेल तर धान्य पेरा. दहा वर्षांची सोय लावायची असेल तर झाडे लावा. शंभर वर्षांची सोय लावायची असेल तर माणसे पेरा. पण हजारो वर्षांची सोय लावायची असेल तर विचार पेरा येणाऱ्या पिढ्या अंधश्रद्धाळू असू नयेत, धर्मांध असू नयेत, राष्ट्रीय वृत्तीच्या नीपजाव्यात, बलदंड दंडाच्या, निधड्या छातीच्या, पोलादी मन आणि मनगटाच्या, सुपीक डोक्याच्या, सर्वांगिण विकसित बुद्धीच्या असाव्यात असे  वाटत असेल तर शिवरायांचा सत्य विचार रुजवला पाहिजे जेणेकरून पुढील हजारो लाखो वर्ष तो विचार टिकला पाहिजे.
        जिजाऊ वंदना म्हणताना शिवपार्वती, शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा राजा संविभागी बळीराजा स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांना वंदन होते भयमुक्त, गुलामीमुक्त दुःख दैन्य मुक्त समाज निर्माण करण्याचा विचार जिजाऊ वंदनेत आहे. कसलीच कुठलीच बंधने कोणावर नाहीत तर सर्वांना प्रगतीसाठी दहा दिशा मुक्त असून सर्व दिशांनी प्रगती करण्याचे स्वातंत्र्य आहे. या सर्वांमुळे जिजाऊ वंदना प्रेरक आणि मार्गदर्शक ठरते अंधाराकडून प्रकाशाकडे नेते. शिवरायांच्या सत्य धर्माकडे नेते. मागच्या वर्षी कोल्हापूरच्या गादीचे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देवच पण अभिषेक आरती करून  त्यांच्या विचार व कर्तुत्वाची माती करून त्यांचे दैवतीकरण करणे आम्हाला मान्य नाही. शेवटी चंद्र सूर्य ही जातील पण छत्रपतींचे विचार आणि कर्तुत्व चिरंतन राहील. ते जपणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि जबाबदारीही. त्यामुळे सन, उत्सव, लग्न समारंभ, घरातील कार्यक्रम वा जयंती, स्मृतीदिन असा कोणताही प्रसंग असो जिजाऊ वंदनेनेच सुरुवात व्हावी म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवप्रेमी म्हणून आपण सारे मिळून हे करूयात आणि आपला इतिहास जपुयात.
जय जिजाऊ जय शिवराय
error: Content is protected !!