ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

शेवगाव तालुक्यातील अपहृत मुलींची सुटका! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अज्ञात महिलेच्या ‘फोन’ने लावला छडा..

शेवगाव तालुक्यातील अपहृत मुलींची सुटका! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अज्ञात महिलेच्या ‘फोन’ने लावला छडा..

शेवगाव;-दहा दिवसांपूर्वी शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथून अपहरण झालेल्या तिनही अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे. गावातील पोपट उर्फ पोपट्या शहादेव बोरुडे याने पाटलाच्या घरी देवीचे व्रत असल्याचे खोटे कारण पुढे करुन तेथे जेवणासाठी घेवून जात असल्याचे सांगत फिर्यादीच्या दोन मुलींसह शेजारी राहणार्‍या अन्य एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला. गेल्या दहा दिवसांत पोलिसांच्या दोन पथकांनी अहमदनगरसह राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये झाडाझडती घेतली, मात्र त्यांचा थांगपत्ता लागला नाही. रविवारी एका अज्ञात महिलेने पोलिसांना फोनवरुन माहिती दिल्यानंतर काही वेळातच सुप्यात झालेल्या कारवाईत अपहृत तिन्ही मुलींसह आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार अपहरणाची घटना दहा दिवसांपूर्वी 19 एप्रिल रोजी शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव शिवारात घडली होती. येथील एक दाम्पत्य आपल्या तीन मुली व एका मुलाला नजीकच्या नातेवाईकाकडे सोडून बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत गावातील पोपट उर्फ पोपट्या शहादेव बोरुडे (वय 20) याने ‘त्या’ नातेवाईकाच्या घरी जात गावच्या पाटलाकडे देवीच्या व्रताचे उद्यापन असल्याने तुमच्या मुलींना जेवणासाठी घेवून जातो असे सांगत फिर्यादीच्या 10 व 12 वर्षांच्या दोन मुलींसह शेजारी राहणार्‍या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलींना आपल्या विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन नेले.

या चौघांनाही दुचाकीवरुन अहमदनगरच्या दिशेने जाताना गावातील एकाने पाहिले. त्याला संशय आल्याने त्याने याबाबत बाहेरगावी असलेल्या त्यातील दोन मुलींच्या वडिलांना फोनद्वारे याबाबत सांगितले. त्यांनी सायंकाळी घरी येवून चौकशी केली असता गावातील पोपट बोरुडे तीन मुलींना घेवून दुपारी बारा वाजता गेल्याची माहिती त्यांना समजली. त्यानंतर मुलींचा सर्वत्र शोध घेवूनही त्यांचा थांगपत्ता न लागल्याने त्याच दिवशी रात्री त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. चेडे चांदगावसारख्या छोट्याशा गावातून एकाचवेळी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याने पोलीस यंत्रणाही सतर्क झाली. याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपासाचे आदेश दिले.

 

गुन्हे शाखेने उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डिले, सचिन आडबल, संदीप चव्हाण, फुरकान शेख, संतोष खैरे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर, भरत बुधवंत, विजय धनेधर व महिला पोलीस छाया माळी यांची दोन पथके तयार करुन शेवगाव शहर व शेवगाव-अहमदनगर रस्त्यावरील दोनशेहून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यातून आरोपी दुचाकीवरुन मुलींना घेवून मराठवाडीपर्यंत गेल्याचे आढळून आले. मात्र त्यापुढील धागेदोरे हाती लागत नसल्याने तपास खोळंबला होता. या दरम्यान पोलीस पथकाने पुणे, मुंबई, धाराशिव, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर व पिंपरी चिंचवड या जिल्ह्यातील आरोपीच्या नातेवाईकांकडेही छापे घालून त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

या दरम्यान अपहरण झालेल्या तिनही मुलींच्या घराच्या आसपासच्या तांत्रिक विश्‍लेषणासह आरोपीचे धागेदोरे मिळवण्याची कवायत सुरु असतानाच रविवारी (ता.28) एका अज्ञात महिलेने गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना फोन करुन तीन अल्पवयीन मुलींसह एक तरुण सुप्यात संशयास्पदपणे फिरत असल्याची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी तत्काळ आपले पथक सुप्याला रवाना केले. मिळालेल्या माहितीत नेमके ठिकाण सांगण्यात आले नसल्याने पोलिसांनी सुप्यातील विविध ठिकाणी तपासणी केली असता अखेर पथकाला त्यांचा सुगावा लागला आणि त्यांनी सापळा रचून आरोपीला जेरबंद करीत तिनही मुलींची त्याच्या तावडीतून सुटका केली.

जवळपास दहा दिवसांनी या मुलींचा शोध लावण्यात अखेर पोलिसांना यश आल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे. या प्रकरणी आरोपी पोपट उर्फ पोपट्या शहादेव बोरुडे (वय 20) याला ताब्यात घेत शेवगाव पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार असून एकाचवेळी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन तो काय करणार होता याचा तपास लावण्यासाठी त्याच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शेवगावचे निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. अपहृत मुलींची सुखरुप सुटका झाल्याने शेवगाव तालुक्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!